त्रिपुटीत शाळेचे नुकसान महामार्गावर झाड कोसळल्याने कोळंबा


-*विवेक काटकर सातारा वार्ताहर :–वादळी वाऱ्यासह वळीवाच्या पावसाचा कोरेगाव तालुक्याला तडाखा; महामार्गावर झाड कोसळले, त्रिपुटीत शाळेचे नुकसान

 

कोरेगाव : कोरेगाव तालुक्यात शुक्रवारी दुपारनंतर वळीवाच्या पावसाने आणि वादळी वाऱ्याने जोरदार हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले. सुमारे तीन तास सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागांत वाहतुकीवर परिणाम झाला, तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने नुकसानही झाले. वाठार स्टेशन परिसरात गारांच्या पावसाने नागरिक आणि व्यापाऱ्यांची धावपळ उडाली, तर त्रिपुटी गावात वादळी वाऱ्यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले.

गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण असून उष्णता आणि उकाड्याने नागरिक त्रस्त झाले होते. शुक्रवारी सकाळी कडक उन्हाचा तडाखा जाणवत असतानाच दुपारनंतर अचानक काळे ढग दाटून आले. त्यानंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

कोरेगाव-सातारा मार्गावरील रेल्वे स्टेशनजवळील पाणीपुरवठा योजनेच्या पंपहाऊससमोर मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. झाड हटविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू नसल्याने रात्रीपर्यंत या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू होती. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

दरम्यान, वाठार स्टेशन येथे भरलेल्या आठवडे बाजारालाही पावसाचा मोठा फटका बसला. बाजारात मोठ्या संख्येने व्यापारी आणि ग्राहक उपस्थित असताना अचानक गारांसह पाऊस सुरू झाल्याने एकच गोंधळ उडाला. व्यापाऱ्यांनी माल वाचविण्यासाठी तातडीने ताडपत्र्या आणि प्लास्टिकचे आच्छादन टाकले, तर ग्राहकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. काही ठिकाणी भाजीपाला, फळे आणि अन्य वस्तू भिजून नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. वादळी वाऱ्यामुळे विविध ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटना घडल्या. मात्र कोणतीही जीवितहानी अथवा मोठी वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

याचदरम्यान, त्रिपुटी गावाला वादळी वाऱ्याचा विशेष फटका बसला. गावातील अनेक मोठी झाडे उन्मळून पडल्याने काही रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले. वीजवाहिन्यांवर झाडे पडल्याने वीजपुरवठाही खंडित झाला. गावातील मुख्य मार्गावर कोसळलेल्या झाडामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

वादळामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, त्रिपुटीच्या इमारतीवर मोठे झाड कोसळल्याने शाळेच्या छपराचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने ही घटना शाळा सुटल्यानंतर घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच अनेक ठिकाणी फांद्या तुटून पडल्याने सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाले आहे.

घटनेनंतर ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी, रस्त्यांवरील पडलेली झाडे हटवून वाहतूक आणि वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, या अवकाळी वळीवाच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे खरीप हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस लाभदायक ठरला असून शेतजमिनीत आवश्यक ओलावा निर्माण झाल्याने आगामी पेरण्यांसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे या पावसामुळे एका बाजूला नागरिकांची तारांबळ उडाली असली, तरी शेतकरी वर्गाने मात्र या पावसाचे स्वागत केले आहे.


3
कृपया वोट करा

लोक अदालत न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!