कर्तव्य दक्ष अधिकारी राजेश वाघमारे यांचा भ्रष्टाचार विरोधी संघर्ष


*सातारा एसीबीची अडीच वर्षात दबंग कामगिरी*

 

*उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली ६३ यशस्वी कारवाया*

 

*सातारा / ज्ञानेश्वर भोईटे*

…………………………….

 

शासन यंत्रणेतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कठोर, पारदर्शक आणि परिणामकारक कारवाई करणारे अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक राजेश वसंतराव वाघमारे यांनी सातारा जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दि. २५ नोव्हेंबर २०२३ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) सातारा युनिटचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला नवी दिशा दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली २५ नोव्हेंबर २0२३ ते २२ मे २0२६ या अवघ्या अडीच वर्षांच्या कालावधीत विविध शासकीय खात्यांतील अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित व्यक्तींविरुद्ध तब्बल ६३ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ही कामगिरी सातारा एसीबीच्या इतिहासातील उल्लेखनीय मानली जात आहे.

 

छत्रपती संभाजीनगर येथे डीवायएसीपी म्हणून राजेश वाघमारे यांची नुकतीच बदली झाली आहे. त्यांच्या रिक्त जागेवर मुंबई येथून शैला शंकर कोरडे यांची साताऱ्यात नियुक्ती करण्यात आली आहे.

 

आता छत्रपती संभाजीनगर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात डीवायएसपी म्हणून काम करताना मोठे आव्हाने असणार आहेत. पण तिथेही भ्रष्टाचाराचे समुळ उच्चाटन करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.

 

राजेश वाघमारे हे पोलीस दलातील अनुभवी, कर्तव्यदक्ष आणि तपासकौशल्यासाठी ओळखले जाणारे अधिकारी आहेत. दोन दशकांहून अधिक काळाच्या सेवेत त्यांनी मुंबई, ठाणे, नागपूर यांसारख्या संवेदनशील ठिकाणी जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. गुन्हे अन्वेषण, गुप्त माहिती संकलन, सापळा कारवाया आणि आर्थिक गैरव्यवहारांच्या तपासात त्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले आहे.

 

सातारा एसीबीचा पदभार स्वीकारल्यानंतर वाघमारे यांनी विभागाच्या कार्यपद्धतीत अधिक गतिमानता आणली. तक्रारदारांशी थेट संवाद, गोपनीय माहितीचे अचूक विश्लेषण, तांत्रिक साधनांचा वापर आणि नियोजनबद्ध सापळा कारवाया यामुळे अनेक भ्रष्ट अधिकारी रंगेहात पकडण्यात यश आले. त्यांच्या नेतृत्वाखाली महसूल, नगरविकास, शिक्षण, भूमी अभिलेख, पोलीस, राज्य उत्पादन शुल्क, आरोग्य, कृषी, वन, समाजकल्याण, वस्तू व सेवा कर, जिल्हा परिषद बांधकाम विभाग आदी विविध खात्यांतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर कारवाई करण्यात आली.

 

एसीबीच्या आकडेवारीनुसार महसूल विभागात सर्वाधिक १४ कारवाया करण्यात आल्या. कामगार विभाग १, त्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागातील ९, नगरविकास विभागातील ५, भूमी अभिलेख आणि शिक्षण विभागातील प्रत्येकी ४, न्याय व विधी विभागातील ५ मराविवि खाते ४, राज्य उत्पादन शुल्क २, पोलीस खाते ३, सहजिल्हा निबंधक कार्यालय १, वस्तू व सेवा कर २, समाजकल्याण विभाग १, माढा बांधकाम विभाग १, अभियांत्रीकी टेंभू कार्यालय २, वनखाते २, कृषीखाते १, आरोग्य खाते २ अशी कारवाई करण्यात आली. या कारवायांमुळे जिल्ह्यातील अनेक कार्यालयांमध्ये भ्रष्टाचाराविषयी धास्ती निर्माण झाली आहे.

 

एकूण दाखल झालेल्या ६३ प्रकरणांमध्ये वर्ग-१ चे ६, वर्ग-२ चे १०, वर्ग-३ चे २८, वर्ग-४ चे ३ अधिकारी-कर्मचारी, ५ खाजगी इसम आणि ११ इतर लोकसेवकांचा समावेश आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत कोणालाही कायद्यापासून सूट नसल्याचा संदेश या कारवायांमधून देण्यात आला.

 

राजेश वाघमारे यांनी १ एप्रिल २००५ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेला सुरुवात केली. महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे प्रारंभीचे प्रशिक्षण आणि त्यानंतर १ एप्रिल २00६ पासून बृहन्मुंबई व ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात त्यांनी सेवा बजावली. पुढे सहायक पोलीस निरीक्षक म्हणून ठाणे आणि नागपूर येथे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. महामार्ग सुरक्षा विभागातही त्यांनी काही काळ सेवा दिली.

 

२०१७ मध्ये पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती झाल्यानंतर त्यांनी बृहन्मुंबई आणि ठाणे शहरात उल्लेखनीय कामगिरी केली. मार्च २०२३ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बृहन्मुंबई येथे नियुक्ती झाल्यानंतर भ्रष्टाचारविरोधी कारवायांतील त्यांचा अनुभव अधिक समृद्ध झाला. याच अनुभवाच्या बळावर नोव्हेंबर २०२३ मध्ये सातारा एसीबीची धुरा त्यांच्या हाती सोपविण्यात आली.

 

वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली सातारा एसीबीने केवळ सापळा कारवायाच केल्या नाहीत, तर नागरिकांमध्ये जनजागृतीचे व्यापक अभियानही राबविले. शासकीय कामासाठी कोणीही लाच मागितल्यास तात्काळ एसीबीशी संपर्क साधावा, असे आवाहन सातत्याने करण्यात आले. यामुळे अनेक नागरिक पुढे आले आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारी नोंदविण्याचे प्रमाण वाढले.

 

…………………………….

 

*सातारकरांच्या आठवणी कायम बरोबर*

 

सातारा अेसीबीचे पोलीस उपनिरीक्षक राजेश वाघमारे यांचे गाव सातारा. आपल्या मायभूमीत काम करताना एक वेगळाच आनंद मिळत होता. या सेवेच्या कार्यकाळात गेल्या अडीच वर्षातील ६३ कारवाया दरम्यान कामाच थोडंस प्रेशर होतच. पण त्याचबरोबर या सातारा शहरासह जिल्हाभरातून मिळालेलं प्रेम, आठवणी आता छत्रपती संभाजीनगर येथे डीवायएसपी म्हणून माझ्या करिअरच्या पुढील प्रवासात जात असताना मी माझ्या ह्रदयात घेवून चाललेलो आहे. अन त्या कायम माझ्याबरोबर २0३२ या सेवा निवृत्तीच्या म्हणजेच पुढील सहा वर्षातील सेवेदरम्यान राहणार असल्याचे वाघमारे यांनी भावनाविवश होत सांगितले.

 

………………..………….

 

*भ्रष्टाचाराला शून्य सहनशीलता*

 

राजेश वाघमारे यांनी सातारा जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका घेतली. कोणत्याही स्तरावरील अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, हा संदेश त्यांनी आपल्या कामातून दिला. परिणामी अनेक कार्यालयांमध्ये कामकाजातील पारदर्शकता वाढली असून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

 

…………………………….

 

*भ्रष्टाचार विरोधात प्रभावी लढा*

 

अडीच वर्षांत केलेल्या ६३ यशस्वी कारवाया, प्रभावी नेतृत्व, तपासातील अचूकता आणि जनतेशी असलेली बांधिलकी यामुळे पोलीस उपअधीक्षक राजेश वसंतराव वाघमारे हे सातारा जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधातील लढ्याचे प्रभावी नेतृत्व करणारे अधिकारी म्हणून पुढे आले आहेत.


3
कृपया वोट करा

लोक अदालत न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!