भरकटणाऱ्या पिढीवर आपल्या पाल्यावर लक्ष द्या निर्भया पथक


विवेक काटकर त्रिपुटी:-

उत्तर कोरेगाव तालुक्यात जिल्हा पोलिसांच्या निर्भया पथकाची भिरकीट पाहायला मिळत आहे. शाळा, महाविद्यालयीन तसेच अकॅडमीमध्ये शिक्षण घेणाऱ्या युवक-युवतींचे आणि पालकांचे प्रबोधन व समुपदेशन करण्यावर या पथकाकडून भर दिला जात आहे.

सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या जिल्ह्यात एकूण सहा निर्भया पथके कार्यरत आहेत. प्रत्येक पथकामध्ये तीन पुरुष व एक महिला पोलीस कर्मचारी काम करीत आहेत. निर्भया पथक क्रमांक तीनकडून सध्या उत्तर कोरेगावात प्रभावी काम केले जात आहे. पिंपोडे बुद्रुक, वाठार स्टेशन यासह ज्या ठिकाणी कॉम्प्युटर अकॅडमी, सैन्य व पोलीस भरती अकॅडमी आहेत, अशा ठिकाणी सध्या हे पथक भेटी देत आहे. त्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या युवक-युवतींना आपले स्वसंरक्षण कसे करावे याची माहिती, तसेच कौटुंबिक हिंसाचारासाठी असलेल्या कायद्यातील तरतुदींची सविस्तर माहिती दिली जात आहे.

खासकरून अल्पवयीन मुली, युवती यांना गुड टच बॅड टच कसा ओळखला पाहिजे हे सांगितले जात असून, चाईल्ड हेल्पलाईन, पोलीस हेल्पलाईनचे नंबर स्वतः जवळ ठेवण्याचे आणि काही अपप्रकार होत असल्याचे निदर्शनास येत असल्यास निर्भया पथकाशी संपर्क करण्याचे आवाहन केले जात आहे. सोशल मीडिया वापरताना अनावधानाने काही चुका होतात त्यावेळी आय टी ॲक्टखाली कारवाया केल्या जातात त्या कशा टाळता येतील यासाठी या पथकांकडून प्रबोधन करण्यात येत आहे.

सध्या सर्वत्र दुचाकींचे कर्णकर्कश हॉर्न, वेगवेगळे सायलेन्सर, फॅन्सी नंबरप्लेट लावण्याचे प्रकार युवकांकडून सुरु आहेत. याशिवाय अनेक पालक आपल्या अल्पवयीन मुलांना दुचाकी चालवण्यास देतात. मोटार वाहन कायद्यानुसार यावर कारवाई होऊ शकते. त्यासाठी पालकांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे असल्याने पालकवर्गाचे समुपदेशन सुद्धा या पथकाकडून करण्यात येत आहे.

या पथकात नामदेव जाधव, विजय बर्गे, विजय राठोड, आरती यादव हे पोलीस कर्मचारी काम करत आहेत.

(फोटो ओळ: वाठार स्टेशन येथील काम्प्युटर अकॅडमीमध्ये युवक युवतींना मार्गदर्शन करताना निर्भया पथकातील कर्मचारी.)


4
कृपया वोट करा

लोक अदालत न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!