सुमित पवार उपसंपादक :-हनुमंतवाडी (ता. फलटण): येथील शेतकरी सागर शिंदे यांच्या शेतामध्ये उभारलेला महावितरणचा वीज वितरण (डीपी) अचानक कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.
घटना घडली त्या वेळी डीपीपासून काही अंतरावर महिला शेतमजूर खुरपणीचे काम करत होत्या. डीपी अचानक कोसळल्याने काही काळ परिसरात घबराट निर्माण झाली. मात्र, महिलांचा जीव थोडक्यात बचावल्याने मोठा अनर्थ टळला.
शेतमालक सागर शिंदे यांनी सांगितले की, संबंधित डीपी धोकादायक स्थितीत असल्याची माहिती त्यांनी अनेक वेळा महावितरणच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिली होती. “डीपी कधीही पडू शकतो, तातडीने दुरुस्ती करा,” अशी वारंवार विनंती करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अखेर भीती व्यक्त केल्याप्रमाणे डीपी कोसळल्याने महावितरणच्या निष्काळजीपणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या घटनेनंतर ग्रामस्थांनी महावितरणने अशा धोकादायक अवस्थेतील वीज यंत्रणेची तातडीने तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ही घटना गंभीर स्वरूपाची असून संबंधित अधिकाऱ्यांनी याची चौकशी करून जबाबदारांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.









