फलटण ग्रामीण पोलिसांची दमदार कारवाई; ४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त


मुख्य संपादक लालासाहेब साबळे :-

महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड

फलटण ग्रामीण पोलिसांची दमदार कारवाई; ४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

फलटण : महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून मंगळसूत्र जबरदस्तीने लुटण्याच्या घटनेचा तपास करताना फलटण ग्रामीण पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. या तपासादरम्यान विडणी परिसरातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, आरोपीकडून सुमारे ४ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता विडणी गावातील २८ फाटा परिसरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने काढून घेण्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी अर्थव उर्फ चिन्मय छगन सुतार (वय २०, रा. विडणी, ता. फलटण, जि. सातारा) याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने विडणी परिसरातील ८ ठिकाणी शेतकऱ्यांच्या मोटारी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत चोरीस गेलेल्या मोटारींसह सुमारे ४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

१४ गुन्ह्यांचा छडा

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मागील दहा दिवसांत या आरोपीच्या तपासातून तसेच इतर तपासातून एकूण १४ गुन्हे उघडकीस आणले आहेत. यामध्ये चोरीचा प्रयत्न तसेच मोटार चोरीच्या विविध गुन्ह्यांचा समावेश आहे.

या प्रकरणांमध्ये भा.न्या.सं. कलम ३०३(२), ३०३(३), ३९०(४) आणि ३९०(८) अंतर्गत गुन्हे दाखल असल्याचे पोलीस पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

या कारवाईमुळे मंगळसूत्र चोरीतील संबंधित महिलेला तसेच मोटार चोरीतील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, चोरीच्या घटनांमुळे त्रस्त असलेल्या शेतकरी वर्गातून पोलिसांच्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रशांत सुबनावळ, सहायक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार, पोलीस हवालदार नितीन चघुले, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, सचिन बावरे, विक्रम बनकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत दडस यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

फलटण ग्रामीण पोलिसांच्या या उल्लेखनीय कारवाईमुळे चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असून, शेतकरी आणि नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

लोक अदालत न्यूज पोर्टल

न्याय, सत्य आणि जनतेसाठी


9
कृपया वोट करा

लोक अदालत न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!