महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचे दागिने लुटणारा चोरटा गजाआड
फलटण | प्रतिनिधी
वडजीणी, ता. फलटण परिसरात महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने लुटणाऱ्या आरोपीला फलटण ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या तत्पर तपासाचे कौतुक होत आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास विडणी गावच्या हद्दीतील २४ फाटा परिसरात ही घटना घडली. महिला आपल्या शेतातून काम करून घरी जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला. निर्जन ठिकाणी संधी साधून आरोपीने महिलेच्या डोळ्यात चटणी टाकली आणि तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. या घटनेनंतर महिलेने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास पथक तयार केले. आरोपीची गोपनीय माहिती मिळवून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. आरोपी हा विडणी
गावातीलच असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणातील आरोपी अथर्व उर्फ चिन्मय छगन सुतार (वय २० वर्षे, रा. विडणी, ता. फलटण, जि. सातारा) यास पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता ४ दिवसांची पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे. आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपीने आपण केरळ पाडिकाणी फिरायला जाण्यासाठी पैशांची गरज असल्याने चोरी केल्याचे सांगितल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रशांत सुबानावळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार तसेच पोलीस कर्मचारी नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, हनुमंत दंडस, तुषार नलवडे आणि अविनाश शिंदे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
फलटण ग्रामीण पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे महिलेवर झालेल्या लुटीचा गुन्हा उघडकीस आला असून, परिसरातील नागरिकांमध्ये पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
लोक अदालत न्यूज पोर्टल
न्याय • सत्य • जनतेसाठी





