सुमित पवार -उपसंपादक –
फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) म्हणून धन्यकुमार गोडसे यांची नियुक्ती झाल्याने संपूर्ण फलटण तालुक्यात समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी त्यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात जबाबदारी सांभाळताना आपल्या कार्यशैलीने नागरिकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं होतं.
कर्तव्यदक्ष, कठोर आणि तितकेच जनसामान्यांशी संवेदनशील असलेल्या गोडसे साहेबांनी आपल्या कामकाजातून “न्यायाला न्याय आणि अन्यायाला अन्याय” हे तत्त्व जपले होते. कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव अथवा हस्तक्षेप न मानता त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून निःपक्षपातीपणे काम केल्याची चर्चा त्या काळात सर्वत्र होती.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात त्यांनी यापूर्वी काम करत असताना परिसरातील गैरवर्तन, दादागिरी आणि गुंडागिरी करणाऱ्या प्रवृत्तींना चांगलाच आळा बसल्याचे नागरिक आजही आठवणीत सांगताना दिसतात. त्यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे अनेक समाजकंटकांमध्ये कायद्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळेच त्यांच्या पुनरागमनाकडे अनेकजण “कमबॅक टायगर” म्हणून पाहत आहेत.
सध्या स्वारगेट विभागात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असलेले धन्यकुमार गोडसे आता येत्या काही दिवसांत फलटणचा पदभार स्वीकारणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली फलटण उपविभागातील पोलीस यंत्रणा अधिक प्रभावी, सक्षम आणि जनतेच्या विश्वासास पात्र ठरेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
लोकअदालत न्यूज विशेष :
“कायद्याचा धाक आणि जनतेचा विश्वास जपणारा अधिकारी पुन्हा फलटणच्या सेवेत!”









